बेकायदेशीर दगडखाणी विरोधात मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी ५ मार्चला काढलेला आदिवासी बांधवाचा मोर्चा पोलीसांनी आडवला..
पोलीस व आदिवासीमध्ये पेटली संघर्षाची ठिणगी ; शेवठी, बेकायदेशीर दगडखाणी मालकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे दिले आदेश..
पनवेल / प्रतिनिधी :
पनवेल शहराच्या हक्काच्या अंतरावर राहणाऱ्या आदिवासींचे बेकायदेशीर दगडखाणीमुळे जगणं अवघड झाले आहे. या बेकायदेशीर दगडखाणी कायमस्वरूपी बंद करण्यासाठी अनेक वर्षापासून या आदिवासींचा लढा आहे. बेकायदेशीर दगडखाणीमुळे आदिवासींना जीव मुठीत घ्यावा लागतोय, परंतु करोडो रुपयांचा महसूल दगड खाणीचे मालक आणि महसूल विभागाचे अधिकारी यांच्या संगमताने महसूल बुडवला आहे. या संदर्भात अनेकदा पत्रव्यवहार तहसील, प्रांत कार्यालय,पोलीस विभाग, सिडको, जिल्हाधिकारी यांना केला होता व आहे.
मात्र या दगड खाणीवर कोणताही परिणाम झाला नाही शेवटी 5 मार्च 2025 रोजी टेंभोडे आदिवासीवाडी, वळवली सागाचीवाडी, वाघऱ्याचीवाडी येथील आदिवासी बांधवांनी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी व मंत्रालयासमोर आपल्या परिवारासह आत्मदहन करण्याचे पत्र पोलीस विभागाला व संबंधित विभागाला दिले होते. आज शेकडो आदिवासी बांधव मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पायी जात असताना खांदेश्वर पोलीस विभागाने अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर बेकायदेशीर चालवत असणाऱ्या दगड खाणीच्या मालकावर गुन्हे दाखल करा परंतु संबंधित सिडको व महसूल विभागाच्या लातूर-मातूर आश्वासनाने येथील आदिवासी बांधव आक्रमक झाले. नंतर पोलीस आणि आदिवासी बांधवांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली; या संघर्षामध्ये आदिवासी महिलांना धक्काबुक्की लागली तर काही आदिवासी महिलांचे कपडे फाटल्याने पुरुष पोलिसांवर आदिवासींचा अधिक आक्रोश पाहायला मिळाला मात्र जमीन हक्क परिषद महाराष्ट्र राज्याचे माऊली सोनवणे यांच्या मध्यस्थीतीने आदिवासी बांधव आणि पोलिसांमधला संघर्ष मिटवण्यात आला.
सिडको महापालिका महसूल विभागाचे अधिकारी लेखी आश्वासन पत्र घेऊन घटनास्थळी आले. तात्काळ दगड खाणी मालकाच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याने संघर्षाची पडलेली ठिणगी शांत झाली. यावेळी जमीन हक्क परिषद महाराष्ट्र राज्याचे माऊली सोनवणे व त्यांचे पदाधिकारी, आंदोलनाचे नेतृत्व जोमी गिरा व समाजसेवक संतोष चाळके, बी. पी. लांडगे, पत्रकार गणपत वारगडा, सामाजिक कार्यकर्ते डी. के. भोपी जयवंत शिद, हिरामण नाईक, बाळू वाघे, जोमा मधे वाघाऱ्यांचीवाडी, सागवाडीतील शेकडो आदिवासी बांधव उपस्थित होते.