आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटपटू होण्यासाठी दिलीप वेंगसरकर देणार विनामुल्य प्रशिक्षण
पनवेल (प्रतिनिधी) आदई सर्कल, नवीन पनवेल येथे पनवेल महानगरपालिकेच्या दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी तर्फे १२, १४, १६ व १९ वर्षांखालील गटांसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. ही निवड चाचणी ०१ मे ते ०४ मे २०२५ या कालावधीत सकाळी ७. ३० ते सकाळी १० पर्यंत आणि सायंकाळी ०४ ते सायंकाळी ६. ३० या वेळेत पार पडणार आहे.
या निवड चाचणीसाठी इच्छुक खेळाडूंनी पांढर्या रंगाचा क्रिकेट युनिफॉर्म, क्रिकेट शूज परिधान करून हजर राहणे आवश्यक आहे. क्रिकेट युनिफॉर्म आणि शूज व्यतिरिक्त इतर सर्व बाबींची व्यवस्था दिलीप वेंगसरकर क्रिकेट अॅकॅडमीतर्फे करण्यात येणार आहे. तसेच जन्मतारखेचा अधिकृत दाखला (जन्म प्रमाणपत्र) सोबत आणणे अनिवार्य आहे.पात्रता निकष (जन्मतारीख): १२ वर्षांखालील गट : ०१/ ०९/ २०२३ नंतर जन्मलेले. १४ वर्षांखालील गट : ०१/ ०९/ २०११ नंतर जन्मलेले, १६ वर्षांखालील गट : ०१/ ०९/ २००९ नंतर जन्मलेले, १९ वर्षांखालील गट : ०१/ ०९/ २००६ नंतर जन्मलेले असे आहे. या निवड चाचणीसाठी येणार्या खेळाडूंमधील १२, १४, १६ आणि १९ वयोगटातील प्रत्येकी २० खेळाडूंची या क्रिकेट प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे. या सर्व खेळाडूंना स्वत: दिलीप वेंगसरकर प्रशिक्षण देणार आहेत. ही सर्व प्रक्रिया विनामुल्य असून, खेळाडूंनी आपले क्रिकेटचे कसब यावेळी दाखवून स्वत:ला सिद्ध करायचे आहे. या प्रशिक्षणासाठीची निवड मे महिन्यात होणार असून, प्रशिक्षण मात्र ऑक्टोबर २०२५ ते मे २०२६ पर्यंत होणार आहे. निवड चाचणीसाठी भरघोस प्रतिसाद अपेक्षित असून, भविष्यातील क्रिकेटपटूंना संधी देण्याचे हे एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे, असे दिलीप वेंगसरकर यांनी सांगितले.