खारघर सेक्टर २० शहा किंग्डम येथील बांधकाम व्यावसायिकाकडून होत असलेल्या वायु व ध्वनी प्रदूषणापासून नागरिकांची सुटका करावी-सौ.नेत्रा पाटील
पनवेल(प्रतिनिधी)-खारघर प्रभाग क्रमांक ४ च्या कर्तव्यदक्ष व कार्यतत्पर मा नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी प्रभागातील नागरिकांना होणाऱ्या वायू व ध्वनी प्रदूषणाच्या बाबत तक्रार प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच मा आयुक्त व प्रशासक पनवेल महानगरपालिका यांच्याकडे केली आहे. खारघर सेक्टर 20 शहा किंग्डम प्लॉट नंबर 23/24 या ठिकाणी मागील अनेक दिवसांपासून जी अर्धवट अवस्थेत बांधकाम करण्यात आलेल्या बिल्डिंगच्या पाडकामाचे काम सुरू आहे तसेच बाजूलाच एक नवीन इमारतीचे काम देखील सुरू आहे. एक विंगचे बांधकाम पाडण्याचे /तोडण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सदर परिसरात मोठ्या प्रमाणात धुळीमुळे वायू प्रदूषण व ध्वनी प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी आजूबाजूच्या बिल्डिंग मधील रहिवाशांनी केलेल्या आहेत. बांधकाम व्यवसायिकांनी कुठल्याही प्रकारचे नियम न पाळत त्यांचे राजरोसपणे उल्लंघन केल्याचे मालमत्ता कर धारकांचे म्हणणे आहे. रहिवाशांनी तक्रार केलेली आहे की सदर बांधकाम व्यवसायिक हा त्या ठिकाणचे पाणी देखील रस्त्यावर सोडून देत आहे त्यामुळे तेथे पाणी तुंबून घाणीचे साम्राज्य होत आहे व पाण्याचे डबके तयार होऊन मोठ्या प्रमाणात डासांची निर्मिती देखील होत आहे. सदर बांधकामाच्या ठिकाणी 18 मीटर उंचीची हिरव्या रंगाची जाळी अच्छाद ित केलेली नसल्याचे हवेत उडणाऱ्या धुळीच्या कणांवर नियंत्रण मिळविण्याकरिता पाण्याची तुषार उडवणे बंधनकारक आहे. परंतु कुठल्याही नियमांचे पालन सदर बांधकाम व्यवसाय करत नाही असा देखील आरोप येथील आजूबाजूच्या सोसायटीतील रहिवाशांनी केलेला आहे.
सदर ठिकाणी रघुनाथ विहार मध्ये भारतीय सैन्य दलातील अधिकारी ज्यांनी देश सेवेत आपले आयुष्य वेचले असे सैनिक बांधव व त्यांचे परिवार याठिकाणी राहतात त्यांना देखील या वायू प्रदूषणाचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. सदर ठिकाणातील रहिवाशी हे मनस्ताप करत आहेत की आम्ही देशासाठी आमच्या जीवाची बाजी लावली आणि आता आम्हाला या वायु प्रदूषणामुळे श्वसनाचे व दम्याचे आजार नक्कीच होतील. काही दमा असलेल्या नागरिकांनी तर आम्हाला मरण यातनांना सामोरे जावे लागत असल्याची भावना व्यक्त केली. अशा देशभक्त जवानांची व त्यांच्या कुटुंबीयांची सर्वस्वी जबाबदारी ही आपल्यावर येते.
सदर ठिकाणी बाजूलाच हॉस्पिटल देखील आहे त्या हॉस्पिटल मधील रुग्णांना देखील या सर्व ध्वनी व वायू प्रदूषणाचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. तसेच आजूबाजूला शाळेकरी विद्यार्थ्यांना व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देखील या गोष्टीचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असून त्यांच्या देखील आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे.
सदर बांधकाम व्यवसायिकावर त्वरित योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा रहिवाशांना व नागरिकांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने व संविधानाने दिलेल्या अधिकाराने आंदोलन, निदर्शन अथवा उपोषण करण्यास आम्हा रहिवाशांना भाग पाडू नये अशी विनंती निवेदनात केली आहे.