चाणक्य खाडीकिनारा स्वच्छतेतून वसुंधरा संरक्षणावर नवी मुंबई महानगरपालिकेचा भर
महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने सूचित करण्यात आल्याप्रमाणे महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 22 एप्रिल या जागतिक वसुंधरा दिनी दिवाळे येथील खाडीकिनारा परिसराची स्वच्छता करण्यापासून विशेष उपक्रम राबविण्यास सुरूवात करण्यात आलेली आहे.
तशाच प्रकारचा स्वच्छता उपक्रम आज 23 एप्रिल रोजी अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली महापालिका अधिकारी, कर्मचारी, स्वच्छताकर्मी यांनी बेलापूर विभाग कार्यक्षेत्रातील टि.एस.चाणक्य खाडीकिनारा परिसरात इंडियन मरीन इन्स्टिट्युटच्या विद्यार्थ्यांसमवेत राबविला. या विशेष स्वच्छता मोहिमेत खाडीकिनारा तसेच किना-यावरील खारफुटी भागातील प्लास्टिक, थर्माकॉल, कागद असा कचरा गोळा करण्यात आला. यामध्ये परिसरातील नागरिकही उत्साहाने सहभागी झाले होते.
यावेळी उपस्थितांनी स्वच्छता मोहीम राबविल्यानंतर घनकचरा व्यवस्थापन विभाग परिमंडळ 1 चे उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांचेसमवेत ‘माझी वसुंधरा’ अभियानाची सामुहिक शपथ ग्रहण केली. यावेळी बेलापूर विभागाचे सहा.आयुक्त डॉ. अमोल पालवे, कार्यकारी अभियंता श्री. राजेश पवार, स्वच्छता अधिकारी श्री. नरेश अंधेर, स्वच्छता निरीक्षक सर्वश्री विजय नाईक, अजित तांडेल, लवेश पाटील, संजय पाटील, महेश मोरे व रत्नमाला नाईक तसेच स्वच्छताकर्मी आणि इंडियन मरीन इन्स्टिट्युटचे विद्यार्थी व नागरिक सहभागी झाले होते.
यावर्षीचा महाराष्ट्रदिन प्रदूषणमुक्त साजरा करण्याचे जाहीर करण्यात आले असून जागतिक वसुंधरा दिनानिमित्त आयोजित करण्यात येणा-या कार्यक्रमाचे ब्रीदवाक्य ‘पर्यावरण वाचवा – वसुंधरा सजवा’ हे आहे. त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिकेने विविध उपक्रमांचे नियोजन केले असून त्यामध्ये लोकसहभागावर विशेष भर दिला जात आहे. याशिवाय शालेय पातळीवरही वसुंधरा रक्षण – संवर्धन विषयक नानाविध उपक्रम राबवित विद्यार्थ्यांच्या मनावर पर्यावरणाची महती बिंबविली जात आहे.
तरी नवी मुंबईकर नागरिकांनी माझी वसुंधरा अभियानाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात येणा-या उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी होऊन पर्यावरणाविषयी आपली जागरूकता आणि बांधिलकी प्रदर्शित करावी असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.